प्रत्येक विवाहित महिलेला आपण आई व्हावं असं वाटत असतं. पण जेव्हा हीच महिला आई होते तेव्हा खऱ्या अर्थाने जबाबदारीला सुरुवात होते. त्यातील सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे बाळाचे संगोपन. नवजात बाळाची काळजी घेण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. मात्र, यातील मुख्य गोष्ट म्हणजे मातेकडून केले जाणारे स्तनपान.
नवजात बाळासाठी आईचे दूध हे अमृतासमानच असते. स्तनपानामुळे आई व बाळामधील नाते अधिक दृढ होते. बाळामध्ये सुरक्षिततेची भावना वाढते. स्तनपानामुळे बाळाचे स्नायू नीट तयार होतात. मातेच्या दुधामध्ये अनके पोषक घटकांचा समावेश असतो. त्यामध्ये जीवनसत्वे, प्रथिने, कर्बोदके व बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या जवळपास सर्व घटकांची योग्य मात्रा असते. हे सर्व घटक फायदेशीर मानले जातात. ठराविक वेळा ठरवून दूध पाजण्याची गरज नाही. बाळाची वाढ होत असताना ते गरजेप्रमाणे दुध पिते.
स्तनपानामुळे होणाऱ्या संप्रेरकाच्या मधील बदलामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. सर्वसाधारणपणे मातेने बाळाला भूकेप्रमाणे दूध पाजावे. मात्र, तीन ते चार तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्यास बाळाला उठून स्तनपान करावे. काही विशिष्ट वेळेला मात्र दर दोन तासांनी स्तनपान करणे योग्य ठरते. स्तनपानामुळे स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होते.
डॉ. चंद्रकांत सहारे (वैद्यकीय सल्लागार विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर)