सांगली : येणाऱ्या काळात राज्याचा मुख्यमंत्री वसंतदादांच्या विचारांचा, सांगली जिल्ह्यातला असेल, हे काळ ठरवणार, असं भाकीत खासदार विशाल पाटील यांनी केले, तर सांगलीचा मुख्यमंत्री असेल की नाही माहिती नाही, मात्र राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं मत आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलं आहे. हे दोन्ही नेते सांगलीच्या मिरजेमध्ये सत्कार समारंभात बोलत होते. यामुळे काँग्रेस पक्षातील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
फडणवीसांनी मराठा समाजाची फसवणूक केली
खासदार विशाल पाटील म्हणाले की, आपण भाजपाचा पराभव करू शकतो, धनशक्तीचा पराभव करू शकतो. या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो हे सांगलीच्या जनतेने दाखवून दिलं. मिरज शहरातील सर्व समाजाने धाडसाने पुढे येऊन मतदान केलं आहे. मनोज जरांगे पाटलांना जी वाईट वागणूक या सरकारने दिली आहे, त्यामुळे मराठा समाजाने भाजपाचा बदला घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असा गंभीर आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला.
राज्यात आपल्याला काँग्रेसचं सरकार आणायचं असून त्यामुळे आपण एक झालो आहोत. आपल्या सर्वाना अहोरात्र काम करायला लागणार आहे. प्रत्येक मतदारसंघात, तालुक्यात संपर्क कार्यालय उघडून नागरिकांची कामे करायची आहेत. काँग्रेसचा पुरोगामी विचार लोकांपर्यत पोहचवायचे असून आगामी विधानसभेत सांगली जिल्ह्यातील चार ते पाच आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून देऊ असं आवाहन देखील खासदार विशाल पाटील यांनी यावेळी केलं.
पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल
पुढे बोलताना विश्वजित कदम म्हणाले, पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल हे नक्की, सांगली जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना फसवण्यात आले असून हे माणसं विसरली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व ताकदीने मतभेद विसरून आपल्याला एक दिलाने काम करायचे आहे. जनता भाजपला कंटाळली आहे.
त्यामुळे मतदारांनी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला चांगले लीड दिले. राज्यात १४ उमेदवार निवडून दिले आहेत. विशालराव, पुढील काळात महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल. तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही हा येणारा काळ ठरवेल, पण काँग्रेस पक्षाचा नक्की असेल असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी यावेळी व्यक्त केला.