Nashik Teachers Constituency Election : राज्यात आता सर्व राजकीय पक्षांच्या नजरा लागून आहेत त्या म्हणजे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर. आरोप प्रत्योरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. आता नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली असून शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये बैठका घेतल्या आहेत.
मात्र ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक गंभीर आरोप केला आहे. जळगाव येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. या आरोपावर शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावात सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले. कुठे आहे निवडणूक आयोग?, असा आरोप सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’वर व्हिडिओ शेअर करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
काय म्हणाले किशोर दराडे?
सुषमा अंधारे यांच्या आरोपावर किशोर दराडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हटले की, मुळातच मला अशा पद्धतीने आरोप करणाऱ्यांची कीव वाटते, हे शिक्षकांचे मतदान असून त्यांच्याकडे कुठलीही मुद्दे नसल्याने चुकीचे खोटे पद्धतीचे आरोप केले जातात.
किशोर दराडेंकडून विवेक कोल्हेंचा ‘या’ नावाने उल्लेख
अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी किशोर दराडे यांच्यावर बोगस शिक्षक भरतीचा आरोप केला होता. यावर किशोर दराडे बोलताना म्हणाले की, मुळातच त्या पप्पूला काहीही कळत नाही. या मतदानासाठी गेल्या सहा महिन्यांपासून नोंदणी सुरू आहे. दोन वेळा शासनाने अध्यादेश काढून नोंदणी झाल्या आहेत. कोणत्याही बोगस नोंदणी झालेल्या नाहीत. असेही किशोर दराडे यावेळी म्हणाले.
शनिवारी जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेत शिक्षक आपले गुलाम होतील, असे वादग्रस्त वक्तव्य किशोर दराडे यांनी केले होते. यावर त्यांनी म्हटले की, चुकीचा अर्थ काढू नका. आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी 1 हजार 160 कोटी रुपये दिले म्हणून शिक्षकांच्या चुली पेटल्या आहेत. मराठी भाषा आहे. त्यामुळे ती कशीही वळते. यामुळे गैरसमज करून घेऊ नये, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.