Aus vs AFG : टी-20 विश्वचषकात आज ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा सामना झाला. या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा थरारक पराभव करत यंदाच्या विश्वचषकात खळबळ उडवून दिली आहे. ऑस्ट्रेलियाला हरवत अफगाणिस्तानचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. गेल्या काही वर्षात अफगाणिस्तान क्रिकेट टीमची कामगिरी ही कौतुकास पात्र ठरत आहे.
सुपर-8 मधील सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला आहे. भारतात झालेल्या 2023 च्या वन-डे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा पराभव केला आणि अफगाणिस्तानला बाहेरचा रस्ता दाखवला होता. आज ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजमध्ये पराभव करत अफगाणिस्तानने बदला घेतल्याचे सगळीकडे बोलले जात आहे.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 127 धावांवर गारद झाला. अफगाणिस्तानकडून गुलाबदिन नायबने 4 विकेट्स तर नवीन-उल-हकने 3 विकेट्स घेतल्या. आज अफगाणिस्तानने या बलाढ्य संघाचा पराभव केल्याने सर्वत्र अफगाणिस्तान टीमचे कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियाने आज सामना जिंकला असता, तर त्याचं उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित झाल असतं. आता ऑस्ट्रेलियाला भारताविरूद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. यादरम्यान सलामीवीर गुरबाजने 49 चेंडूंचा सामना करत 60 धावा केल्या. इब्राहिम झद्रानने 51 धावांची खेळी केली. यादरम्यान ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 3, ॲडम झाम्पाने 2 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानसमोर पत्करली हार
अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरलेल्या दिग्गजांनी ओतप्रोत भरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने शरणागती पत्करल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही. 19.2 षटकात 127 धावा करून ती ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 41 चेंडूंचा सामना करत 59 धावा केल्या. पण त्याची ही झुंझ अपयशी ठरली.