राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील गार गावच्या हद्दीतील येडे वस्ती येथील गेट नंबर १६ या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून भुयारी मार्ग तयार केला आहे. त्या भुयारी मार्गाचे काम वर्क ऑर्डर नुसार झालेले नाही. सिमेंट कंपनीच्या फायद्यासाठी रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गाची खोली वाढवलेली आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
वाजवी पेक्षा जास्त भुयारी मार्ग खोल झाल्यामुळे पावसाचे पाणी भुयारी मार्गात साचून राहत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, शेतकरी महिला व पुरुष यांना रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करावी लागत आहे. या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड यांच्यावतीने केंद्र सरकार, केंद्रीय रेल्वेमंत्री, सेंट्रल रेल्वे, डी. आर. एम. पुणे यांना वेळोवेळी मेल, ट्विटरवर तक्रार दाखल करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत गार यांच्या वतीने देखील नुकतेच पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, रेल्वे प्रशासन तक्रारीकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे.
येडे वस्ती, नविन गार, मुळगार येथील रहिवासी कामानिमित्त तसेच दवाखान्यात, शालेय विध्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही वर्षांपासून अष्टविनायक महामार्ग बंद आहे. काही दिवसांपूर्वी गार ते कानगाव ओढ्यावरील पुल वाहून गेला. रात्रीच्या वेळी एखादी घटना घडली तर दौंड व पाटस या ठिकाणी जाण्यासाठी रस्ताच नाही.
लवकरच जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्यामुळे दौंड तालुक्यात यवत गावात पालखी आल्यानंतर व रोटी घाटमार्ग दौंड तालुक्यातील पालखी सोहळा बारामती तालुक्यात जाईपर्यंत नगर व सोलापूर वरुन येणारी वाहतूक ही दौंड, सोनवडी, नवीन गार, मुळगार, कानगाव पाटस या मार्गावरुन वळविली जाते. अशीच परिस्थिती राहिली तर बाहेरील वाहने जाणार कशी? याचे उत्तर रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावे. अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसून येतील, असे अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड शहर अध्यक्ष गणेश जगताप यांनी सांगितले.