जालना : छगन भुजबळ मराठा आणि धनगर समाजामध्ये दंगल घडवून आणण्याच्या तयारीत आहेत. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगतो की, राज्यात दंगल झाली तर त्याला केवळ छगन भुजबळ जबाबदार असतील. तसेच काही लोक सोशल मीडियावर लिहितात की, संविधानाचं आंदोलन पाहायचं असेल तर वडी गोद्रीला जाऊन पाहा. वाघ रस्त्यावर झोपलाय तर तू झोप पांढऱ्या मिश्या करून, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
काय म्हणले मनोज जरांगे पाटील ?
छगन भुजबळ मराठा आणि धनगरांध्ये दंगल घडवणार असून विनाकारण हे चिघळणार आहे. ते चिघळू देऊ नका. शेवटी हे त्यांचे वाद असून ते तशी भाषा वापरत असतील, तर ते दंगल घडवून आणणार आहेत. छगन भुजबळ काड्या लावत आहेत. ते सरकारमध्ये बसून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. छगन भुजबळ यांनी धनगर आणि मराठा असा वाद लावला आहे. त्यांनी मराठ्यांविरोधात खोटी आंदोलनं सुरु केली आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले कि, छगन भुजबळ प्रसारमाध्यमांसमोर कबूल करतात की ओबीसी आंदोलक त्यांचे लोक आहेत. याचा अर्थ ते आता उघडे पडले आहेत. चोरी कधी झाकली जात नाही. त्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांना कामांची विभागणी करून दिली आहे. कोणी माझ्यावर शाब्दिक हल्ला तसेच माझ्यावर वैयक्तिक पातळीवर हल्ला करायचा, कोणी मराठा आंदोलनावर टीका करायची, कोणी मराठा आरक्षणावर आक्षेप घ्यायचा, असे भुजबळ त्यांच्या लोकांना सांगतात, असंही जरांगे म्हणाले.
भुजबळांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय मुख्यमंत्र्यांविरोधात बोला : मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील म्हणाले, छगन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे कि, तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोला. मुख्यमंत्री मराठा आहेत, त्यामुळे त्यांच्यावर टीका करा. हे सगळं बोलत असताना मी मात्र तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही आंदोलन करा. मी मंत्र्यांना तुमच्यापर्यंत घेऊन येतो. तर ओबीसी आंदोलक म्हणतात की मराठ्यांच्या उपोषणस्थळी मंत्री गेले होते, तर ते आमच्या उपोषण स्थळी देखील आले पाहिजेत. अशा प्रकारचा दबाव निर्माण केला जात असून मुख्यमंत्र्यांवर आरोप केले जात असल्याचे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.