पुणे : पुण्यात कोयता गँगने पुन्हा डोके वर काढले आहे. वडगावशेरी येथील गणेशनगर परिसरात कोयता गँगने धुमाकूळ घालत हातामध्ये कोयते आणि दगड घेत पोलिसांच्या गाडीसह १५ ते २० वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये सहा कार ,चार रिक्षा, तीन दुचाकी आणि इतर वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सलग दुसऱ्या दिवशी शहरात वाहनांची तोडफोड झाल्याने पोलिसांचा धाक उरला की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. काल २१ जून ला सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी या ठिकाणी कोयता टोळीने धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर मध्यरात्री चंदननगर परिसरातील वडगावशेरीत वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.