Tanaji Sawant : मंत्री असले तरी आपण हाडामासाचे माणूस असतो, आणि माणसाला भाव-भावना असतात. अशाच एका मंत्र्याला आपले अश्रू अनावर झाल्याचे बघायला मिळाले. ते मंत्री म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत. मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त कुटूंबाशी संवाद साधताना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांन अश्रू अनावर झाले होते.
राज्यात सध्या आरक्षणावरुन वातावरण कमालीचे तापले आहे. मराठा समाजाचे ओबीसीत समावेश करावा म्हणून आंदोलन तीव्र झाले आहे.गेल्या वर्षीपासून आंदोलनाला धार आलेली आहे. अंतरवाली सराटीपासून सुरु झालेले आंदोलन राज्यभर पसरले. लाखोंचे मोर्चे निघाले. काही पदरात पडले, काही आश्वासनांची अजून अंमलबजावणी झालेली नाही.
या निराशेतून काही तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या. घरातील कर्त्या माणसांनी अशी टोकाची भूमिका घेतल्याने समाज हादरुन गेला आहे. या घरातील महिलांचा आक्रोश मन हेलावून टाकतो आहे. असे कित्येक घर आहेत ज्यांनी आपल कुणीतरी गमावलं आहे.
..आणि भावना झाल्या अनावर
आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी बोलत असताना, मंत्री तानाजी सावंत यांच्या डोळ्यात अश्रू आले. कुटुंबियांचा आधार गेल्यावर काय होत, याचा जाणाऱ्या व्यक्तीने विचार करावा. सर्व बांधवांना हातापाया पडून सांगतो, कि हत्ती गेला आहे आता फक्त शेपूट राहिले आहे. त्यामुळे आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मुला-मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी
यावेळी, प्रसाद देठे यांच्या कुटुंबियांना सावंत यांनी 5 लाख रूपयांचा धनादेश दिला. तसेच त्यांच्या तीन मुला-मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची जबाबदारी तानाजी सावंत यांनी घेतली. तानाजी सावंत यांनी ओबीसी मराठा समाजातील युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन केले. यावेळी उपस्थित अनेकांना अश्रू अनावर झाले. त्यांना आपले हुंदके थांबविता आले नाही. यावेळी तरुणांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये. सरकारवर विश्वास ठेवावा. आरक्षणाची प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे आवाहन करण्यात आले.