ओमकार भोरडे
तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील तळेगाव न्हावरे रोडवर घोलपवाडी येथे शुक्रवारी(दि.२१) सकाळी नऊच्या सुमारास दुचाकीला पाठीमागून वेगात येणाऱ्या दुचाकीची धडक बसल्याने, झालेल्या अपघातात भगवान रामभाऊ कर्पे (वय ६५, रा.कर्पे वस्ती, टाकळी भीमा),या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आपघाताचे सत्र सुरूच
तळेगाव न्हावरे रस्त्यावर घोलपवाडी येथे पाठीमागून वेगात आलेल्या गुड्डू कुमार (सध्या रा. पिंपळे धुमाळ, ता. शिरूर, मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्या दुचाकीची कर्पे यांना जोरात धडक बसली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर तळेगाव ढमढेरे येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केले.
त्यानंतर त्यांना वाघोली येथील दवाखान्यात नेण्यात आल्यानंतर शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी कर्पे यांना मृत घोषित केले. शिक्रापूर पोलिसांनी रूपेश रामदास साकोरे यांच्या फिर्यादी वरून गुड्डू कुमार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या रोडवर अपघाताचे सत्र सुरूच आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच रस्त्यावर सुखदेव म्हस्के या ज्येष्ठ नागरिकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. रस्त्यावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी माहितीदर्शक फलक, गतिरोधक बसवावेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांनी केली आहे.