पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पीएमआरडीएच्या आयुक्तांना अनधिकृत होर्डिंगबाबत कानउघडणी केल्यानंतर हिंजवडीतील ३ अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, पुणे-सोलापूर व पुणे-नगर महामार्गासह जिल्ह्यात हजारो अनधिकृत होर्डिंग धोकादायकरीत्या उभे आहेत. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच, पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण कारवाई करणार का? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
घाटकोपर नंतर पुण्यातील मोशी व लोणी काळभोरमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. या पाश्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अनधिकृत होर्डिंग काढून टाका. तसेच मालक व फ्लेक्स लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानुसार प्रशासनाने काही ठिकाणे कारवाई करून दिखावा केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत अनधिकृत होर्डिंग व्यावसाय जोमाने सुरु आहे. त्यामुळे प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची गांभीर्याने अंमलबजावणी करीत नसल्याचा धक्कादायक बाब समोर येत आहे.
दरम्यान, पाऊस व वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग पडल्याच्या तीन घटना घडल्या आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे व पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी अनधिकृत होर्डिंग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांचे अंमलबजावणी होत नसल्याने केवळ या सूचना कागदावरच राहिल्या आहेत. कारण चिरीमिरीच्या संबंधापोटी अनधिकृत होर्डिंग मालक व चालकांवर प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नाही. अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
होर्डिंगचा लोखंडी सांगाडा निघणार कधी?
पुणे-सोलापूर व पुणे नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग आहेत. जागा मालकांनी युक्ती करून फ्लेक्स काढला आहे. मात्र होर्डिंग चा लोखंडी साचा तसाच धोकादायकरीत्या लटकलेल्या अवस्थेत ठेवला आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे होर्डिंगचा लोखंडी सांगाडा निघणार कधी? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
कारवाई कधी ?
पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी कारवाईच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचाविल्याचे समोर येत आले. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगचा जागा मालक व चालकाचे फावले आहे. अनधिकृत होर्डिंगवर प्रशासनाच्या वतीने कारवाईची बडगा का उगारला जात नाही? असा सवाल नागरिकांनी केला आहे. तसेच होर्डिंगचा जागा मालक व चालकांवर कारवाई कधी होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळून 18 जणांचा मृत्यु झाला होता. तर 75 हून अधिक जण जखमी झाले होते. लोणी काळभोर येथीलही दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले होते. सुदैवाने मोशी घटनेत केवळ वाहनांचे नुकसान झाले होते. हडपसर, शेवाळेवाडी, मांजरी कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन, वाघोली, केसनंद, लोणीकंद, पेरणे, कोरेगाव भिमा व परिसरात अनधिकृत होर्डिंग नागरी वस्तीत आहेत. होर्डिंग च्या खाली टपऱ्या, दुकाने, हॉटेल, हातगाड्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत. भविष्यात अनधिकृत होर्डिंगचा सांगाडा कोसळून अजून एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? याची हमी कोण घेणार? असा सवाल नागरिकांनी केला आहे.