नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रोटेम स्पीकर म्हणजेच लोकसभेच्या हंगामी अध्यक्षाची नियुक्ती केली आहे. ओडिशातील भारतीय जनता पक्षाचे खासदार भर्तृहरी महताब यांची लोकसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील स्थायी सभापतीची नियुक्ती होईपर्यंत ते सभागृहाच्या अध्यक्षांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतील.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 95(1) अंतर्गत प्रोटेम स्पीकर म्हणून भर्तृहरी महताब याना नियुक्त केले आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, प्रोटेम स्पीकरला मदत करण्यासाठी सुरेश कोडिकुन्नील, थलिककोट्टई राजुथेवर बालू, राधामोहन सिंह, फग्गन सिंह कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, भर्तृहरी महताब हे लोकसभा अध्यक्ष निवडीपर्यंत पीठासीन अधिकारी म्हणून कर्तव्य बजावतील.
भर्तृहरी महताब यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी बिजू जनता दल (बीजेडी) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. प्रादेशिक पक्षाच्या अलीकडच्या कारभारावर नाराजी असल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. 1998 पासून बीजेडीच्या तिकिटावर कटकमधून सहा वेळा विजयी झालेल्या महताब यांनी यावेळी भाजपच्या वतीने निवडणूक लढवली होती. त्यांनी बीजेडीचे संतरूप मिश्रा यांचा 57 हजार 77 मतांनी पराभव केला. सध्या ते भाजपचे खासदार आहेत. 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होणार आहे. नवनिर्वाचित सदस्य 24-25 जून रोजी शपथ घेतील. यानंतर 26 जून रोजी नवीन लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.
कोण आहेत भर्तृहरी महताब?
भर्तृहरी महताब यांचा जन्म 8 सप्टेंबर 1957 रोजी ओडिशातील अगपदा जिल्ह्यातील भद्रक येथे झाला. ते ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री डॉ. हरेकृष्ण महताब यांचे पुत्र आहेत. राजकारणासोबतच ते लेखक असून सामाजिक कार्यातही योगदान देतात. त्यांनी उत्कल विद्यापीठाच्या रावेनशॉस कॉलेजमधून 1978 साली पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 1998 मध्ये बीजेडीच्या तिकिटावर त्यांनी पहिल्यांदा कटक लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकून संसदेत पोहोचले. यानंतर त्यांनी 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये कटक मतदारसंघातून सलग विजय मिळवला. बीजेडीकडून सहा वेळा खासदार म्हणून निवडून येऊन ते लोकसभेत पोहोचले.
कटकचे खासदार भाजपच्या गोटात कसे आले?
मात्र, यंदा महताब यांनी बाजू बदलल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. 28 मार्च 2024 रोजी त्यांनी बीजेडीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्याचा महताब यांच्या राजकारणावर काहीही परिणाम झाला नाही. यावेळी त्यांनी कटकमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि बीजेडीच्या संतरूप मिश्रा यांचा 57077 मतांनी पराभव केला. अशा प्रकारे ते सातव्यांदा खासदार म्हणून निवडून आले.
प्रोटेम स्पीकरची नियुक्ती कशासाठी होती?
प्रोटेम स्पीकर यांची संसदेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. नियमित सभापतीची निवड झालेली नसताना ही नियुक्ती करण्यात आली आहे. निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देणे हे प्रोटेम स्पीकरचे काम असते. याशिवाय नवीन सभापती निवडीची प्रक्रिया पार पाडावी लागते. प्रोटेम स्पीकरची भूमिका तात्पुरती असते आणि नवीन सभापती निवडीनंतर ही जबाबदारी संपते.