नवी दिल्ली : सध्या अनेक कार सीएनजीवर धावतात. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजीचा दर कमी आहे. शिवाय कार मायलेजही चांगलं देते. त्यामुळेच सीएनजी कारनंतर आता सीएनजी बाईकही येणार आहे. प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी बजाज ही सीएनजी बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे.
बजाजने देशात 25 वर्षांपूर्वीच पहिल्यांदा सीएनजी ऑटो लाँच केली होती. आता पुन्हा एकदा बजाज मोबिलिटीच्या क्षेत्रात धमाका करणार आहे. बजाजची सीएनजी बाईक पुढील महिन्यात भारतात लाँच होणार आहे. बजाजची CNG बाईक 5 जुलै 2024 रोजी भारतात लाँच होईल. ही बाईक 110-150 सीसी इंजिनमध्ये येऊ शकते.
बजाजची ही बाईक हायब्रीडमध्ये येणार आहे. याचा अर्थ गरज भासल्यास ते पेट्रोलमध्येही बदलता येईल. सीएनजी संपल्यास बाईक चालवण्यासाठी पेट्रोलची छोटी टाकीही दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या बाईकमध्ये टेलिस्कोप फोर्क्स, इंडिकेटर्स, एक मोनोशॉक युनिट, अलॉय व्हील, सिंगल पीस सीट, डिस्क आणि ड्रम ब्रेक्स देण्यात येणार आहे.