उरुळी कांचन : आता दिवसाही बिबट्याचे हल्ले होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाच प्रकारची घटना उरुळी कांचन जवळ असलेल्या टिळेकरमळा (ता. हवेली) येथील गोबरगॅस असलेल्या परिसरात घडली आहे. टिळेकरवाडी येथील शेतकरी दत्तात्रय विलास होले यांच्या तीन शेळ्या बिबट्याने जागीच ठार केल्याची घटना गुरुवारी (ता. 20) सकाळी साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय होले हे टिळेकरवाडी परिसरात राहतात. त्यांच्याकडे काही जनावरे व काही शेळ्या आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी दुध काढून जनावरे शेतातील रोजच्या ठिकाणी बांधली होती. तसेच शेळ्या जवळच एका झाडाखाली चरण्यासाठी सोडल्या होत्या. होले रोजच्याप्रमाणे दुध घेऊन घरी गेले होते. त्याचवेळी शेजारी असलेल्या उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करून तीन शेळ्यांना जागीच ठार केले.
शेतातील लाईट हि दहा वाजण्याच्या सुमारास येणार म्हणून घरून जेवण करून होले हे शेतात साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आले असता त्यांना त्यांच्या तीन शेळ्या या निपचित पडलेल्या आढळून आल्या. जाऊन पाहणी केली असता त्यांच्या मानेवर हल्ला केल्याचे दिसून आले. तसेच जमिनीवर बिबट्याच्या पाउलखुणा दिसून आल्या. यावरून शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याचे कळले.
दरम्यान, या घटनेत शेतकरी दत्तात्रय होले, यांचे जवळपास 35 ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली असून वनाधिकारी घटनास्थळी पंचनामा करावा अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
याबाबत बोलताना शेतकरी दत्तात्रय होले म्हणाले, या घटनेत ३५ ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. तसेच परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून पिंजरा लावून बिबट्याला पकडावे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
टिळेकरवाडी व परिसरात बिबट्याची डरकाळी वाढली…
हिंगणगाव, खामगाव टेक, टिळेकरवाडी, कोरेगाव मूळ परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्यांचे सत्र सुरुच आहे. परिसरात बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. भर दिवसा बिबट्याने हा हल्ला केल्याने बिबट्याची अजून दहशत वाढली आहे. परिसरात उसाचे क्षेत्र वाढल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा मोठी आहे. त्यातच बिबट्याचे दर्शन वाढले आहे. तरी वनविभागाने तातडीने पिंजरा लाऊन बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यानी केली आहे.