पुणे प्राईम न्यूज डेस्क: फोनमुळे अनेकदा अनेक घरांमध्ये भांडणे होतात. या फोनमुळे अनेकवेळा पती-पत्नीमध्ये घटस्फोटाची परिस्थिती निर्माण होते. पण या सगळ्यात क्वचितच असा कोणी नवरा असेल, ज्याने आयफोन उत्पादक कंपनी ॲपलकडून घटस्फोटासाठी नुकसानभरपाई मागितली असेल आणि त्यासाठी कोर्टात केसही दाखल केली असेल.
असेच एक प्रकरण इंग्लंडमध्ये समोर आले आहे, जिथे ॲपलमुळे बिझनेसमॅन पतीचे रहस्य उघड झाले आणि त्यामुळे पत्नीने त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. त्यानंतर पत्नीने घटस्फोटाची मागणी केल्याने संतापलेल्या पतीने ॲपलकडून 52 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
इंग्लंडमधील एका व्यावसायिकाने त्याच्या आयफोनवरून कॉल गर्लला काही मेसेज पाठवले आणि नंतर हे मेसेज डिलीट केले. कॉल गर्लला पाठवलेले मेसेज डिलीट केल्यानंतरही त्याच्या पत्नीने ते वाचले. त्यानंतर पतीकडे घटस्फोटाची मागणी केली. खरं तर, व्यावसायिक पतीने देखील ज्या आयडीने ॲपल आयफोनवर लॉग इन केले होते, त्याच आयडीने घरी मॅकबुकवर लॉग इन केले होते. त्यामुळे पत्नीने मॅकबुकवर कॉल गर्लला पतीने पाठवलेले मेसेज वाचले.
ॲपलचे फॅमिली शेअरिंग फीचर
ॲपल आपल्या उपकरणांमध्ये कुटुंब सामायिकरण फिचर प्रदान करते. या फीचरमध्ये, तुम्ही एकाच आयडीसह पाच ॲपल डिव्हाइसेसवर लॉग इन करू शकता. फोटो, व्हिडिओ आणि इतर सामग्री या डिव्हाइसवर स्वयंचलितपणे सामायिक केली जाईल.
पतीने मागितली 52 कोटींची भरपाई
पत्नीने घटस्फोटाची मागणी केल्याने संतापलेल्या पतीने ॲपलवर कोर्टात केस दाखल केली. ॲपलने आपले घर फोडल्याचा आरोप करत 5 मिलियन पौंडची मागणी केली. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 52 कोटी रुपये आहे. ॲपलने स्पष्टपणे कळवावे की, जर एकच ॲपल आयडी अनेक उपकरणांवर लॉग इन केला असेल, तर सर्व डिवाइसमधून कंटेन्ट डिलीट करावे लागेल, असे याचिकाकर्त्या पटीने म्हटले आहे.