मुंबई : लोकसभा निवडणुकीतील झालेला मोठा पराभव महायुतीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. तर महाविकस आघाडीने जोरदार कामगिरी केली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला गेला आहे. आता महायुतीमधील पक्षातील आमदारांना थोपवून ठेवण्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यासाठी महायुतीत मोठी लॉबिंग सुरू झाली आहे. दरम्यान , विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मात्र महायुतीच्या मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांना डिवचण्याच काम सुरु केल आहे.
राज्यात अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मागच्या विस्तारात फक्त अजितदादा गटाच्या लोकांनाच फक्त संधी देण्यात आली होती. भाजप आणि शिंदे गटातून कुणालाही शपथ देण्यात आली नव्हती. त्यामुळे आता होणाऱ्या विस्तारात अजितदादा, शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांना संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र, किती लोकांना आणि कोणाला मंत्रीपदाची शपथ देणार हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. असं असलं तरी तिन्ही पक्षातील आमदारांनी मंत्रिपद मिळावं म्हणून जोरदार लॉबिंग सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना जोरदार टोला लगावला आहे.
संजय शिरसाट यांची तर अडचण होऊन बसली आहे. मंत्रीपद मिळणार म्हणून त्यांनी आधीच कपडे शिवून ठेवले आहेत. त्यांना मागच्या 2 वर्षांपासून मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. निदान शेवटचे चार महिने तरी मंत्रिपद मिळेल, असं त्यांना वाटायला लागलं आहे. शिरसाट यांना चार महिने तरी मंत्रिपद द्या, तसंही पुढचे सरकार हे मविआचे येणार आहे, असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
मला कोणत्या लेव्हलला नेऊन ठेवलंय पाहा..
2019 मध्येच रोहित पवार हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, असा गौप्यस्फोट काल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केला होता. त्यावर बोलताना रोहित पवार यांनी तटकरे यांच्यावर निष्ण साधला आहे. बरं झालं तटकरे साहेब म्हणाले नाही, की मला अमेरिकेत जाऊन राष्ट्रपती पदाची निवडणूक लढायची होती. कधी हे मला बच्चा म्हणतात, कधी म्हणतात मंत्रीपद पाहिजे, मुख्यमंत्री पद पाहिजे, यांनी मला कोणत्या लेव्हलला नेऊन ठेवलंय तुम्हीच पाहा, असा टोला रोहित पवार यांनी तटकरे यांना लगावला आहे.