पुणे : आषाढी वारी पालखी सोहळा जवळ येऊन ठेपला आहे. पंढरपूर येथे १७ जुलै रोजी आषाढी वारी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो आहे. या सोहळ्यासाठी देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी, तर आळंदीयेथून ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा २९ जून रोजी निघणार आहे. पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबविला जातो.
या उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे यंदाच्या आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. त्यांच्या सोबत काँग्रसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे ह. भ. प. भारत महाराज जाधव, मार्मिक साप्ताहिकाचे संपादक मुकेश माचकर, कवी अरुण म्हात्रे, अभिव्यक्ती चॅनलचे रविंद्र पोखरकर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत, अशी माहिती शामसुंदर महाराज सोन्नर यांनी दिली.
‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम गेली दहा वर्षांपासून राबविला जात असून यंदाचे अकरावे वर्ष आहे. शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली आणि शरद कदम, अविनाश पाटील, वर्षा देशपांडे, सुभाष वारे, राजाभाऊ अवसक, विशाल विमल, दत्ता पाकिरे यांच्या पुढाकाराने याचे आयोजन करण्यात येते.
यंदा संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात ७ जुलै रोजी ही सर्व मंडळी बारामती ते सणसर या मार्गावर चालणार आहेत. मुंबईतील ‘सिव्हर ओक’ या शरद पवार यांच्या निवासस्थानी शामसुंदर महाराज सोन्नर, सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांनी सोमवारी १७ जून रोजी या उपक्रमाची माहिती देण्यासाठी भेट घेतली.