मुंबई : राज्यातील लोकसभा निकालानंतर आता सर्व पक्षांचे लक्ष लागून आहे, ते म्हणजे विधानपरिषद निवडणुकीकडे. यामध्ये महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी? कोण कुणाला धडा शिकवणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निकालात राज्यात महाविकास आघाडीने महायुतीला धोबी पछाड दिला. राज्यातील मोठा पराभव महायुतीच्या चांगलाच जिव्हारी लागली आहे.
त्यातच आता घटक पक्षातील कुरबुरी डोके वर काढत आहेत. अजित पवार गट विरोधात भाजप असा समाना रंगताना दिसत आहे. तर महाविकास आघाडीत सुद्धा मोठा भाऊ कोण? यावरुन शीतयुद्ध सुरु असल्याचे चित्र आहे. त्यातच विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीत क्रॉस वोटिंगची भीती वाढली आहे. त्यात कोण विजयी ठरणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
क्रॉस वोटिंगची भीती
या विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंगची शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभा निवडणुकीतील हाराकिरीमुळे महायुतीमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातच या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या विधानपरिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान असल्यामुळे कुंपणावर असलेले आमदार हे क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचा फटका हा सर्वात जास्त राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे यांना बसण्याची शक्यता आहे.
राजकीय गणितं
सध्या विधानसभेचे संख्याबळ 274 आहे. त्यामुळे भाजपा आमदारांच्या संख्याबळानुसार 5 जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित दादा प्रत्येकी दोन-दोन विधान परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू शकतात. तर काँग्रेस पक्षाची 1 जागा सहज निवडून येऊ शकते. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे संयुक्त म्हणून एक जागा निवडून येऊ शकते. या निवडणुकीत संभाव्य गणित पाहून आणखीन ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे,विधान परिषद निवडणूक ही अधिवेशन कालावधीत येत असल्यामुळे या काळात हॉटेल पॉलिटिक्स होण्याची दाट शक्यता आहे.
पक्षीय बलाबल..
- भाजप : १०३,
- अजित पवार गट : ३९,
- काँग्रेस : ३७,
- शिंदे सेना : ३७,
- ठाकरे गट: १६,
- शरद पवार गट : १३,
- बाविआ : ३,
- समाजवादीपक्ष: २
- एमआयएम : २
- प्रहार : २
- मनसे :१
- माकप : १,
- जनसुराज्य : १,
- शेकाप : १,
- स्वाभिमानी पक्ष : १,
- रासप : १,
- क्रा शे प : ,
- अपक्ष ; १३
एकूण : २७४