नाशिक: दुचाकीस्वार कोयताधारी त्रिकूट पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून संशयितांच्या ताब्यातून दुचाकीसह तीन धारदार लोखंडी कोयते हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैद अनिस अत्तार उर्फ शेख (वय १९, रा. शिवपुरी चौक, पंडीतनगर, सिडको), निलेश सखाराम लोखंडे (वय १९ रा. पाथर्डीगाव) व अरशद हिकमत शेख (रा. चुंचाळे फाटा, संजीवनगर) अशी संशयित कोयताधारीची नावे आहेत. पपया नर्सरीकडून अंबड लिंकरोडच्या दिशेने ट्रिपलसिट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास पोलिसांनी वखारीजवळील पेट्रोल पंप भागात दुचाकी अडवून तिघांची अंगझडती घेतली. यावेळी त्यांच्याकडे कोयते मिळून आले. या कारवाईत तीन धारदार कोयते व एमएच १५ इयू ११८९ ही दुचाकी हस्तगत करण्यात आली असून याबाबत अंमलदार भुषण शेजवळ यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार अनिल आहेर करीत आहेत.