मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून हाताने स्वत:चे पाय धुवून घेतल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहेत. एका गावात संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर पटोले यांचे पाय चिखलात भरले असल्याने कार्यकर्त्याने ते धुतले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच काँग्रेसकडून सारवासारव करण्यात येऊ लागली आहे.
महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने भरलेले पाय एका काँग्रेस कार्यकर्त्याने धुतले होते. पटोले यांच्या कृतीवरून राज्यभरात नाना पटोलेंवर विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. परंतु, अशीच घटना सात वर्षांपूर्वी अकोला जिल्ह्यातच घडली होती. 25 मे 2017 रोजी अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावंडे या गावात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपले पाय शेतकऱ्यांकडून धुवून घेतल्याचा प्रकार घडला होता. भाजपने काढलेल्या दीनदयाल उपाध्याय शेतकरी संवाद यात्रेदरम्यान हा प्रकार घडला होता.
त्यावेळी भाजपचे तत्कालिन खासदार संजय धोत्रे, महाराष्ट्र भाजपचे तत्कालीन संघटनमंत्री रवी भुसारी आणि आमदार रणधीर सावरकर यांचे पाय यावेळी शेतकऱ्यांनी धुतले होते. विशेष म्हणजे नेत्यांनीही या प्रकाराला कोणताही विरोध न करता आनंदाने आपले पाय धूवून घेतले होते. त्यावेळी काँग्रेससह विरोधकांनी या प्रकारावर मोठी टीका केली होती. त्यानंतर भाजपचे संघटनमंत्री रविंद्र भुसारी यांना पक्षाकडे स्पष्टीकरणही देखील द्यावे लागले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांचे पद गेले होते.