मुंबई : कित्येक दिवस झाले विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांची निवड प्रक्रियाही सुरु केली होती. निवडणूक आयोग या निवडणुकीची घोषणा कधी करणार याची सर्वाना उत्सुकता होती. दरम्यान, आता अखेर निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जारी केले आहे.
‘हा’ असेल निवडणूक कार्यक्रम
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. तसेच त्याच दिवशी, 12 जुलै रोजी निकाल जाहीर केला जाणारा आहे. या निवडणुकीसाठी येत्या 25 जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसचूना जारी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना 2 जुलैपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 3 जुलै रोजी अर्जांची छानणी केली जाणार असून, उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज 5 जुलैपर्यंत मागे घेता येणार आहे. 12 जुलै रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. तसेच सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येणारा आहे. 12 जुलै रोजीच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
‘हे’ आमदार होणार निवृत्त
विधानसभेच्या आमदारांनी मतदानाच्या माध्यमातून नियुक्त केलेले विधानपरिषदेच्या 11 आमदारांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर अन्य व्यक्तींची आमदार म्हणून निवड केली जाईल. 27 जुलै रोजी कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांमध्ये रमेश पाटील, निलय नाईक, विजय गिरकर, रामराव पाटील (भाजप), अनिल परब (शिवसेना ठाकरे गट), मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट), महादेव जानकर (भाजप मित्र पक्ष), डॉ. वजाहत मिर्झा व डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुराणी (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेकाप) या 11 आमदारांचा समावेश आहे.