पुणे : यश सहजासहजी मिळत नाही. क्षेत्र कोणतंही असू दे, त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी आणि टिकून राहणं महत्वाचं असतं. उद्या परिस्थिती कशी असेल याबद्दल आपण सांगू शकत नाही, परंतु आपली मेहनत उद्याची परिस्थिती बदलून ठेवण्याची ताकद मात्र ठेवत असते.
एखाद्याला किती वेळा यशाने हुलकावणी द्यावी? आणि त्या हुलकावणीने थोडं ही न डगमगता अडचणींसमोर दोन हात करत धीरोदात्तपणे उभं राहून यश मिळवणं हे शब्दात वर्णन करता येणारी गोष्ट नसते. असच अवर्णनीय यश मिळवलं आहे ते म्हणजे ग्रामीण भागातून आलेल्या मयूर अविनाश जाधव या विद्यार्थ्यांनं.
मयूर जाधव या विद्यार्थ्याची भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागामध्ये ‘सहाय्यक सुरक्षा अधिकारी – A’ (वर्ग 2) पदी निवड झाली आहे. मयूर जाधव याने मिळविलेल्या यशाने कुटुंबात आणि गावात आनंदी वातावरण दिसून येत आहे. तसेच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मयूर जाधव हा विदर्भातील उमरखेड तालुक्यातील बोरगाव तांडा या खेडे गावातील आहे. ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात येऊन त्याने आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. मयूर जाधव पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयातून बीए (अर्थशास्त्र) तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम झालेला आहे. सोबत नेट – सेट परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झालेला आहे.
मयूर जाधव त्याच्या महाविद्यालयीन जीवनात NCC च्या माध्यमातून विविध ठिकाणी इंटर्नशिप सुद्धा केलेली आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा असते. घरापासून , आपल्या आई-वडिलांपासून लांब राहून, वेळेवर पोटाला चिमटा काढून अभ्यास आणि अभ्यास या एकाच ध्यासाने विद्यार्थी पेटलेले असतात. अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून रात्रीचा दिवस करून मेहनत घेत असतात. वाट्याला येणारं अपयश बाजूला सारून पुन्हा जोमाने पुढच्या परीक्षेच्या तयारीला लागतात.
करोना काळातही तो लढत राहिला..
मयूर जाधव यांच्या या प्रवासात सुद्धा अनेक अडचणी आल्यात. वडील अविनाश जाधव हे राज्य परिवहन मंडळमध्ये एस.टी ड्रायव्हर आहेत. आई ज्योतिबाई शिवणकाम करतात. घरची परिस्थिती तशी बेताचीच. मयूरने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्यात परंतु त्यात त्याला यश आलं नाही. मध्येच करोना काळ आला. त्यात तर सगळंच थांबून होतं. दरम्यान, मयूरने खाजगी कंपनीत जॉब केला, नंतर खाजगी कॉलेजला प्राध्यापक म्हणून कामही केले. तर दुसरीकडे मयूर स्पर्धा परीक्षा देत राहिला. त्यातच त्याची भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागामध्ये सहाय्यक सुरक्षा अधिकारी – A (वर्ग 2) पदी निवड झाली. शेवटी मयूर जाधव याचा संघर्ष जिंकला. मयूर भारत सरकारमध्ये अधिकारी झाला.
यशात आई-वडिलांचा मोठा वाटा
त्याच्या या यशस्वी प्रवासात सर्वात मोठा वाटा आहे तो म्हणजे आई-वडिलांचा. त्यांच्याबद्दल तो भरभरून सांगत असतो. ‘ते माझ्यामागे ठामपणे उभे राहिले नसते तर मला हे यश मिळवण्यासाठी किती काळ लागला असता माहिती नाही. माझ्या यशात आई वडील आणि माझ्या प्रवासात भेटत जाणाऱ्या सर्व व्यक्तींचा वाटा आहे.’ असेही मयूर आवर्जून सांगतो. त्याच हे यश, अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या कित्येक उमेदवारांना प्रेरणा देणारं आहे. मयूरवर सर्वांकडुन शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
काळ-वेळेच भान ठेवून चांगल्या वृत्तीने आपलं काम सातत्याने केल्यावर, कोणत्या ना कोणत्या स्वरुपात यश नक्की मिळते. यावर माझा विश्वास आहे.
मयूर जाधव (सहाय्यक सुरक्षा अधिकारी – A, अणुऊर्जा विभाग, भारत सरकार)