पुणे : सुप्रिया सुळे यांनी नुकतीच चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. त्या बोलल्या कि, राज्यात 1 जूनपासून मुलींना मोफत शिक्षण मिळणार, अशी घोषणा तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र, आता जून महिना उलटत आला तरी याची अंमलबजावणी झालेली नाही. लोकप्रियतेसाठीच सरकार अन् मंत्री घोषणा करत असतात असा टोला देखील सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
मुलींना मोफत शिक्षणाच्या घोषणेच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील आणि सरकारवर जोरदार टीका केली. लोकप्रियतेसाठी सरकार अन मंत्री केवळ घोषणा करतात ही अत्यंत खेदाची अन निषधार्ह बाब असल्याचे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. राज्यात 1 जूनपासून मुलींना मोफत शिक्षण मिळणार अशी घोषणा तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र, अजूनही या घोषणेची अंमलबजावणी झाली नसून, याच मुद्यावरुन सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी यांसह 662 अभ्यासक्रमांना मोफत प्रवेश मिळणे अपेक्षित होते. परंतु घोषणेबाबत कॅबीनेटमध्ये चर्चा झाली किंवा त्या संदर्भात शासन निर्णय वगैरे प्रकाशित झाल्याचे दिसून आलेले नाही.
यामुळे यावर्षी सदर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. स्वतः मंत्री महोदयांनी ही घोषणा केल्यामुळे त्याचे गांभीर्य जास्त आहे. परंतु अद्याप याबाबत काहीच झाल्याचे दिसत नाही. ही अत्यंत खेदाची अन निषधार्ह बाब असल्याचेही सुळे यावेळी म्हणाल्या आहे.