अमोल दरेकर
पुणे : राज्यामध्ये मान्सून दाखल झाल्यापासून सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शिरूर तालुक्यातील कासारी येथे काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. पावसाने जोरदार बॅटिंग करत ओढे, नाले वाहू लागले.
गेले दोन तीन दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर, जोराच्या पावसाने हजेरी लावल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. मागील वर्षीच्या मानाने या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त असल्याने, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असल्याने पेरणीला वेग आल्याचे पाहायला मिळाले.
परंतु कासारी भागात मात्र मोठ्याप्रमाणात शेतीसह रस्त्याचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ढगफुटी सदृश्य पावसाने येथील जीवनमान विस्कळीत झाले आहे. येथील दूध व्यावसायिक यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तरी शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.