मुंबई : लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली आणि राज्यातील पक्षांनी आगामी विधानसभेसाठी तयारी सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने कमालीचे यश संपादन केले आहे. त्यामुळे मविआचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याच अनुषंगाने आदित्य ठाकरे बोलत होते. महायुतीचं सरकार फक्त सहा महिने आहे, नोव्हेंबरमध्ये आपल्याला मविआ सरकार बसवायचं आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं आहे.
सरकार फक्त सहा ते आठ महिने
आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, हे सरकार फक्त सहा ते आठ महिने आहे. मिंधे सरकारने घोळ केला आहे, हे ज्यांना-ज्यांना वाटतंय ते बाहेर पडतील, महाराष्ट्रप्रेमी बाहेर पडतील. अनेक खासदार बाहेर पडतील. जे दोन मित्र पक्ष आहेत त्यांना सांगतो, स्पीकर तुमचा बनवा, नाहीतर भाजपचा स्पीकर झाल्यास पहिला तुमचा पक्ष फोडतील. अशी जोरदार टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली. ते पुढे म्हणाले कि राज्यातील मिंधे गँग, भाजप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून अनेक जण बाहेर पडणार आहेत. जे गद्दार आहेत, पक्ष चोर आहेत त्यांना आम्ही पुन्हा घेणार नाही. भाजप हा महाराष्ट्र द्रोही पक्ष आहे. असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
‘या’ महिन्यात आपल्याला पुन्हा सरकार बसवायचं
आदित्य ठाकरे म्हणले कि, ही निवडणूक आपण जिंकणार ही खात्री आहे. ही निवडणूक सुरुवात आहे, या निवडणुकीनंतर आपल्याला हेच वातावरण दिसणार आहे. नोव्हेंबरला आपल्याला पुन्हा सरकार बसवायचं, म्हणजे बसवायचंच आहे.
या इथे लोकशाही चालते
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, अमोल कीर्तीकर यांचे निवडणूक बघा, यंत्रणेचा गैरवापर केला. भाजपच्या माजी मंत्र्याने सांगितलं, जे भाजपच्या मनात आहे, सिंगल पार्टी रूल आणायचे, संविधान बदलायचं आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, 400 पार आम्हाला हवं आहे, कारण 400 पार झालं तर आम्हाला संविधान बदलायचं आहे. पण याचं संविधानाने इथे प्रत्येकाला आवाज दिलेला आहे. आपण केंद्र सरकारला दाखवलंय, या देशात कुणाची मस्ती चालत नाही. हुकूमशाही चालत नाही, इथे लोकशाही चालते. या आक्रमक पद्धतीने आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली.