इन्शुरन्स अर्थात विमा ही आता काळाची गरज बनली आहे. त्यानुसार, अनेक कंपन्यांकडून विमा सेवा पुरवली जाते. त्यात खासगी कंपन्यांसह सरकारी बँकांकडून विविध प्रकारच्या विमा योजना म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी आणल्या जात आहेत. पण केंद्र सरकारच्या अशा काही विमा योजना आहेत त्याची माहिती अनेकांना कदाचित माहिती नसेल. केंद्र सरकारची विमा योजना अत्यंत माफक अशा दरात उपलब्ध आहे. त्याचा फायदाही चांगला आहे.
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) ही एक सरकारी विमा योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून बँकखातेदारांना अवघ्या 436 रुपयांमध्ये हा लाभ घेता येणार आहे. कारण, या योजनेचा वार्षिक हप्ताच 436 रूपये असून, यातून दोन लाख रुपयांचे विमा कवच उपलब्ध होते.
यासाठी बँकेत किंवा पोस्टात बचत खाते असणे आवश्यक आहे. बचत खाते जून ते ऑगस्ट या कालावधीत उघडले तर पुढील वर्षीच्या मे महिन्यापर्यंतचा विमा हप्ता 436 भरावा लागतो. ऑगस्टनंतर खाते उघडले तरीही योजनेत सहभागी होता येते.
पुढील वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण वर्षाचा 436 रुपये हप्ता बँक खात्यातून वळता होतो. ही समूह विमा योजना आहे. त्यामुळे 18 ते 50 या वयोगटातील सर्व सदस्यांना एकसमान विमा हप्ता द्यावा लागतो. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात बँक खात्यातून परस्पर प्रीमियमची रक्कम कापली जाते.
तसेच 50 वय असलेली व्यक्ती जी पूर्वी सहभागी होती तिला 55 व्या वर्षांपर्यंत या योजनेत सहभागी होता येते. या विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित अर्थात नॉमिनीच्या बँक खात्यात दोन लाख रुपये जमा केले जातात. या योजनेची माहिती आणि अर्ज https://jansuraksha.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
असे असले तरी या योजनेत सहभागी झाल्यानंतर पहिल्या 30 दिवसांत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विम्याचा लाभ मिळत नाही. मात्र, त्यानंतर वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत कधीही आणि कोणत्याही कारणाने पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यास पूर्ण दोन लाखांची विमा रक्कम नॉमिनीच्या खात्यात जमा होते.
आत्महत्या केली तरीही विमा कवच
नैसर्गिक मृत्यू असो किंवा अपघाती तरीही विम्याची रक्कम मिळवता येऊ शकते. इतकेच नाहीतर सर्पदंश किंवा एखाद्या पॉलिसी होल्डरने आत्महत्या जरी केली तरी त्याच्या मागे असणाऱ्या नॉमिनीला विम्याची रक्कम मिळवता येऊ शकणार आहे.
20 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी घेतला लाभ
या योजनेच्या सुरुवातीपासून 10 एप्रिल 2024 पर्यंत 20.07 कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यानुसार, 7,82,000 मृत्यू दाव्यांपोटी 15,640 कोटींची रक्कम नामनिर्देशित व्यक्तींना देण्यात आली. ही योजना केवळ गरिबांसाठीच आहे असा गैरसमज नाही तर सर्वांसाठी उपयोगी पडते.
प्रधानमंत्री सुरक्षा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा योजना (पीएमएसबीवाय) ही योजना 18 ते 70 मधील बँक खातेदारांना केवळ 20 रुपये विमा हप्ता भरून घेता येते. अपघाती मृत्यूसाठी दोन लाख रुपयांचे तर अपघातात कायमचे अपंगत्व (एक हात किंवा एक पाय याचे अंगविच्छेदन, बहिरेपणा, अंधत्व आल्यास) आल्यास एक लाख रुपयांचे विमाकवच प्राप्त होते.