मुंबई : चित्रपट निर्मात्याच्या खात्याची गोपनीय माहिती चोरी करत सायबर ठगाने त्याच्या खात्यातून साडेचार लाख रुपये ऑनलाइन लंपास केल्याचा प्रकार अंधेरीमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत. अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला सर्कल परिसरात राहात असलेले राकेश साकट (५२) हे चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे युनियन बँक ऑफ इंडिया बँकेत बचत खाते आहे. ११ मे च्या सकाळी नेहमीप्रमाणे ते व्यायामशाळेतून घरी परतत असताना त्यांच्या मोबाईलवर ओटीपी आले. त्यांनी ते कोणालाही शेअर केले नाही. तरीसुद्धा त्यांच्या खात्यातून तीन व्यवहार होत ४ लाख ५० हजार रुपये वजा झाले.
खात्यातून झालेल्या या संशयास्पद व्यवहारानंतर राकेश यांनी सायबर पोलिसांच्या १९३० हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून तक्रार दिली. त्यानंतर त्यांनी आंबोली पोलीस ठाण्यात जात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीबाबत फिर्याद दाखल केली आहे. राकेश यांच्या खात्यातून एचडीएफसी बँक- सिल्वासा, बँक ऑफ महाराष्ट्र -मयार विहार आणि कर्नाटका बँक-गाझियाबाद येथील खात्यांमध्ये वळती करण्यात आली आहे.