पुणे : अवघ्या महाराष्ट्राच्या मनात अधिराज्य गाजवणारा 2016 ला प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटातील रिंकूच्या लग्नाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तिच्या वडिलांनी त्यांना नेमका कसा जावई हवा आहे याविषयी बोलताना सांगितले आहे.
नुकतेच ‘फादर्स डे’च्या निमित्ताने राजश्री मराठी या युट्युब चॅनेलला रिंकु आणि तिच्या वडिलांनी भेट दिली. यावेळी त्यांनी रिंकूच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत आणि आपल्या भावी जावयाच्या अपेक्षा सांगितल्या. रिंकू जो मुलगा आपला जोडीदार म्हणून ठरवेल तो चालेल. पण तिने सांगितल्यावर आम्ही त्यावर निर्णय घेऊ असे, रिंकूचे वडील महादेव राजगुरू यांनी सांगितले. मात्र, मला हा मुलगा आवडतो असे तिने सांगितल्यावर आम्ही लग्नासाठी तात्काळ होकार देणार नसल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
रिंकुचे वडिल म्हणाले, “ज्या पद्धतीने आम्ही रिंकुला स्वातंत्र्य दिलंय त्याच पद्धतीने त्यानेही तिला द्यावं. इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको हे असं नकोय. हे क्षेत्रच असं आहे की, प्रत्येक ठिकाणी तिला जावचं लागतं. या गोष्टी ज्याला समजल्या तोच तिला समजून घेऊ शकतो. असा मुलगा असेल तर आमची काहीच अडचण नाही. ”
रिंकू ही मुळची सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील आहे. रिंकूचे वडील महादेव राजगुरू हे शिक्षक आहेत. रिंकू आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीतील अभिनेत्रीपैकी एक असली तरी आजही अकलूजमध्ये तिची ओळख ही राजगुरू सरांची मुलगी अशीच आहे.
‘सैराट’या चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरूने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘सैराट’मुळे रिंकू प्रसिद्धीझोतात आली होती. या चित्रपटामुळे तिने यशाचे शिखर गाठले. तिने साकारलेले आर्ची हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.