महाड : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून कर्जतच्या एका दाम्पत्याने महाडमधील डॉक्टरची फसवणूक केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महाड शहरातील वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर आदेशकुमार पाथरे यांच्या मुलीला कर्जत मधील डॉ. एन. वाय. तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देतो, असे सांगून एका दाम्पत्याने त्यांच्याकडून ६ एप्रिल २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत जुना पोस्ट महाड येथील त्यांच्या क्लिनिक येथून ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात १८ लाख ८० हजार रुपये घेतले होते. त्यातील चार लाख रुपये डॉक्टर पाथरे यांना त्याने परत केले.
परंतु, उर्वरित रक्कम देण्यास मात्र दाम्पत्याने टाळाटाळ केली. तसेच पाथरे यांच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश न देता त्यांची फसवणूक तर केली. शिवाय त्यांच्या पत्नीला मानसिक त्रास देवून शिवीगाळ करून धमकीही दिली, अशी तक्रार आदेशकुमार पाथरे यांनी दोघा दाम्पत्याविरोधात पोलिसांत दिली आहे. त्यानुसार महाड शहर पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.