संतोष पवार
पळसदेव : पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये गुणवत्तावाढ आणि संवर्धन अभियान चळवळ प्रभावीपणे राबवून शाळांचे मूल्यमापन करून शंभर टक्के शाळांची तपासणी करणार असल्याचे मत जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रीडामंच सभागृह पुणे येथे मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना भाऊसाहेब कारेकर म्हणाले की, विद्यालयांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि संख्यात्मक माहिती विद्यालयातील विविध उपक्रमाची पीपीटी तयार करणे, दुबारसेवा पुस्तके अद्ययावत करणे, विद्यार्थी आरोग्य तपासणी करणे, आधार अपडेशन करणे, विद्यार्थीनींसाठी सॅनिटरी नॅपकिन मशिन तक्रार पेटी सीसीटीव्ही कॅमेरे अद्ययावत असणे, शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाची संचयिका एमईपीएस ॲक्टची प्रत ठेवणे, शालेय पोषण आहार संच मान्यता अद्ययावत सेवा ज्येष्ठता यादी वेतन देयके शालांत परीक्षा आदि बाबत सूचना केल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, तर प्रास्ताविक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी केले. याप्रसंगी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे, हरून अत्तार उपशिक्षणाधिकारी निलेश धानापुने, प्रणिता कुमावत, सुधिर चटणे, लेखाधिकारी बी. व्ही. घुमरे, मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक आदि उपस्थित होते.