इंदापूर : सध्या सर्वत्र ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. डिजीटल पेमेंट पद्धतीमुळे सायबर चोरीच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत आहे. सर्वसामान्य नागरिक या सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अलगद अडकतात. खासकरून वयोवृद्ध लोक याला मोठ्या प्रमाणावर बाली पडतात. तसेच काही सुशिक्षित नागरिक देखील यामध्ये अडकल्याचे पाहायला मिळते. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांची फसवणुक झाली आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांना चोरट्यांनी इमोशनल करत त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे घेतले. त्यांना पंधरा हजार रुपयांना गंडा घातल्याची माहिती खुद्द भरणे यांनी एका बैठकीदरम्यान दिली.
याबाबत सविस्तर माहिती देताना आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, मला फोनवरून एकाने आमचा अपघात झाला आहे, गाडीतील दोन इसम जागीच ठार झाले असून आम्ही देखील जखमी झालो आहोत. आम्हाला उपचारासाठी तातडीने पैसे पाठवा, अशी समोरून मागणी केली. मी त्यांना ऑनलाईन पैसे पाठवत मदतही केली. एखाद्याला आपण संकटातून वाचवण्यासाठी तातडीने मदतीचा हात देतो. तसा मी मदतीचा हात दिला. मात्र, यामध्ये माझी फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. अशी फसवणूक करणारी टोळी सध्या कार्यरत असल्याचे समजते. यामुळे आपण सर्वांनी सावध रहावे, असं देखील भरणे यांनी म्हटले आहे.
मी फसलो आहे, हे मी बाहेर कोणाला सांगितले नाही. मात्र, आणखी एका आमदाराला देखील अशाच प्रकारे फसवलं गेलं आहे. यापासून आपण योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे असे देखील भरणे यांनी सांगितले. ही फसवणारी टोळी पालघर येथील असल्याचे सांगत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना आ. दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनास केली आहे.