पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये आळ्या सापडणे ही विद्यार्थ्यांसाठी नवीन गोष्ट नाही. आता पुन्हा एकदा कॅम्पसमधील वसतिगृह क्रमांक ८ मधील मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात किडा आढळल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जेवण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला मळमळत असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेने विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे. असं असलं तरीही विद्यापीठ प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचं दिसत आहे. यापूर्वीही असे प्रकार वारंवार घडल्याचे समोर आले होते. त्याविरोधात विद्यापिठातील विद्यार्थ्यानी वेळोवेळी आंदोलन करत आवाजही उठवला. मात्र, तरीही असे प्रकार थांबताना दिसत नाहीत.
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती तथा भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समितीचे सदस्य राहुल ससाणे म्हणाले की, आज वसतिगृह क्रमांक ८ (मुलांचे) येथील मेसमधून एका विद्यार्थ्याचा फोन आला. आणि म्हणाला सर मी जेवण केले आहे. आता मला खूप मळमळ होत आहे. अजून किती दिवस आम्ही हे असे किडे, झुरळाचे निकृष्ट अन्न खायचे आहे? अशी तक्रार सादर विद्यार्थ्याने केली आहे.
ससाणे पुढे म्हणाले, भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समितीचा सदस्य या नात्याने मी सातत्याने या निकृष्ट जेवणाच्या विरोधात आवाज उठवत आलो आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची ठोस धोरणात्मक उपायोजना झालेली दिसत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अशाच प्रकारचे निकृष्ट अन्न विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांना दिले जात आहे. दरवर्षी विद्यार्थी येतात जातात परंतु या जेवणाच्या दर्जामध्ये कसल्याही प्रकारचे परिवर्तन झाल्याचे दिसत नसल्याचे ससाणे म्हणाले.