महिंद्रा रणधीर
पुणे : सद्याच्या परिस्थितीमध्ये नोकरी मिळविणे हे अशक्यप्राय झाले आहे. सगळीकडे मोठ्या प्रमाणात स्पर्धा बघायला मिळत आहे. अनेक युवक युवती अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत घेत असतात. पण प्रत्येकाला यश मिळतच अस नाही. परंतु जर योग्य मेहनत घेतली तर तुम्हाला यश मिळविण्यावाचून कुणी अडवू शकत नाही. इच्छाशक्ती असेल तर परिस्थिती कशीही असू दे, यशाला गवसणी घालणं शक्य होते. हेच शक्य करून दाखवलं ते म्हणजे धनकवडी परिसरातील अंजली भुरुक या विद्यार्थिनीने. अंजली भुरुक हिची नुकतीच महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा लेखासेवा व लेखाधिकारी पदी निवड झाली आहे. तर तिची मोठी बहीण ऋतुजा भुरुक हिची महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था नामतलिकेत शासकीय प्रमाणित लेखा परीक्षक म्हणून निवड झाली आहे.
पुण्याच्या ग्रामीण भागातून पुढे येऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, वाट्याला येतील ते काबाडकष्ट करुन आपल्या कुटुंबाच्या शैक्षणिक विकासासाठी झटणारे संपुर्ण भुरुक कुटुंबीय यांचाही या यशामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. “आपल्यात असणारी कुवत युवा पिढीने ओळखायला हवी. सातत्यपूर्ण अभ्यासाबरोबर आपले प्रयत्न आणि योग्य दिशा हवी. तेव्हाच आपण निश्चित केलेल्या ध्येयापर्यन्त पोहोचू शकतो.”असे मत यशाचे गमक सांगताना अंजली व ऋतुजा यांनी व्यक्त केले.
“आपल्या मुलांनी कर्तृत्ववान व्हावे, त्यांनी यशाची शिखरे गाठावीत असे जर पालकांना वाटत असेल, तर त्यांनी आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना न करता, त्या परिस्थितीत त्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.” अशा भावना यावेळी या विद्यार्थिनींचे वडील सामाजिक कार्यकर्ते श्री.अनंता उर्फ अण्णा भुरुक यांनी व्यक्त केल्या .
याप्रसंगी भुरुक कुटुंबीय तसेच माजी नगरसेविका मोहिनी देवकर , कवी व लेखक गोपाळ कांबळे, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल काटे, जनस्वराज सोशल अँड वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड.प्रशांत साळुंके , सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र देवकर हे मान्यवर उपस्थित होते. अंजली व ऋतुजा या भगिनींच्या यशाबद्दल अंकुश मित्र मंडळ ट्रस्ट ,जाणीव फाउंडेशन, जनस्वराज सोशल अँड वेल्फेअर फाउंडेशन, सद्गुरू शंकर महाराज उपासना केंद्र या संस्थांनी या परिवाराचे अभिनंदन केले आहे..