सोलापुर : सोलापुरात मोठा अनर्थ होता होता टळला. रस्त्यावर धावत असणाऱ्या एसटी बसच्या स्टेअरिंगचा रॉड अचानक तुटून एसटी रस्त्याच्या खाली गेल्याची धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यात घडली. स्टेअरिंगचा रॉड तुटल्यानं चालकाचे एसटीवरील नियंत्रण सुटले होते. मात्र, बस पुढे जाऊन चिखलात फसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या बसमध्ये 70 ते 75 प्रवासी होते. या अपघातात चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले असून बाकीचे सर्व प्रवासी हे सुखरुप आहेत.
प्रवासी किरकोळ जखमी
दरम्यान, ही घटना मंद्रूप-निंबर्गी रस्त्यावरील काळे वस्ती जवळ घडली आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही बस सोलापूरहून कुसूरकडे निघाली होती. अचानक एसटीच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्यानं चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्यावरून खाली गेल्यानंतर वडाच्या मोठ्या झाडाला घासून चिखलात जाऊन फसली. त्यामुळं सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. अपघातात एसटीचे किरकोळ नुकसान झाले आहे. तर एसटीतील चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.