मुंबई : महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या पायी वारकरी दिंड्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून निघणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना राज्य सरकारकडून वीस हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयाने महाराष्ट्रभरातल्या जवळपास दीड हजार वारकरी दिंड्यांना अनुदान मिळणार आहे.
वारकरी साहित्य परिषद मंडळाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेतली होती. या मंडळाच्या शिष्टमंडळाने दिंड्यांना ५० हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी सरकारकडे केली होती. वारकरी साहित्य परिषद मंडळाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी चर्चेअंती २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचे निर्देश दिले आहेत.
विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शेकडोच्या संख्येने दिंड्या-पालख्या दरवर्षी येत असतात. या सगळ्या पालख्या पायी चालत आषाढी एकादशीच्या आधी एक दिवस पंढपुरात दाखल होतात. मात्र, या प्रवासादरम्यान अनेकदा वारकरी आजारी पडतात, दुखापतग्रस्त होतात, एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेत वारकऱ्यांन जीव देखील गमवावा लागतो.
तसेच अनेकांना अनेक कारणांनी वारी करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनुदान मिळाल्यास त्यांची वारी घडेल, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील यांनी केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन राज्य सरकारने वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
वारकरी साहित्य परिषदेचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीत शिष्टमंडळाने आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत ५० हजार रुपयांऐवजी २० हजार अनुदान देण्याचे मान्य केले.