अलिबाग : पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून अलिबाग येथे फिरायला आलेल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. अविनाश शिंदे असे मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी आहे. अविनाश हा आपल्या चार मित्रांसह पुण्यातील आळंदी येथून अलिबागमध्ये गुरुवारी फिरायला आला होता. आळंदी येथे एका कंपनीत सर्वजण कामाला होते. अलिबाग समुद्रकिनारी आल्यानंतर अविनाश एकटाच समुद्रात पोहण्यासाठी उतरला. समुद्रातून आपल्या मित्रांना हात करत होता. मात्र, काही वेळातच तो दिसेनासा झाला. पावसाळी वातावरण असल्याने समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे पाण्याचा अंदाज आला नसल्याने अविनाश बुडाल्याचा अंदाज आहे. अविनाश दिसत नाही म्हणून मित्रांनी किनाऱ्यावरील जीवरक्षकांना माहिती दिली.
त्यांनतर त्वरित जीवरक्षक समुद्रात उतरले. मात्र, अविनाशचा शोध लागला नाही. अलिबाग पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले. समुद्राला भरती असल्याने अविनाशचा शोध घेण्यात अडचण येत होती. मात्र, संध्याकाळी न्यायालयाच्या मागील बाजूस किनाऱ्यावर त्याचा मृतदेह आढळून आला. अविनाशच्या नातेवाईकांना झालेल्या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. पावसाळ्यात समुद्रात पोहण्यास बंदी असतानाही अनेकजण हे धाडस करून नाहक आपला जीव गमावत आहेत.