देहू : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या श्री क्षेत्र देहूगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. येथे जगातील सर्वात मोठ्या पायऱ्यांची विहिर साकारली जात आहे. साधारणत: 90 हजार क्युबिक मीटरच्या आकाराची ही विहीर असणार आहे. या विहिरीला 4 हजार पाचशे पाय-या असणार आहे, अशी माहिती भूमीपुजनाप्रसंगी देण्यात आली.
या विहिरीच्या कामाचा शुभारंभ श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत नुकतेच झाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थितीत होते.
विहीर तयार करण्याची कल्पना गुजरात आणि राजस्थान मधील पाय-यांची विहिरी पाहून सुचल्याचे सांगण्यात आले. ही विहिर शाश्वत टाऊनशीपमध्ये साकारली जात असून ते पर्यंटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. गेल्या 500 वर्षातील अशा प्रकारचा केला गेलेला पहिलाच जलसंधारण प्रयत्न असल्याची माहिती संदीप सोनिग्रा यांनी दिली.
ही विहीर दोन जर्मन विद्यापीठांनी राबवलेल्या ऊर्जा आणि साठवलेल्या पाण्याचा पुर्नवापर करुन हे पाणी परिसरातील निवासी भागासाठी वापरात आणली जाणार आहे. विहिरीलगत निसर्गोपचार केंद्र व ध्यानधारणा केंद्र असणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी ही विहिर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.