नवी दिल्ली: आरएसएसचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाचे कारण ‘अहंकार’ असल्याचे सांगितले आहे. कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले, प्रभू रामाची पूजा करणारा पक्ष अहंकारी झाला होता, त्यामुळे त्यांची संख्या 241 झाली. या निवडणुकीत भाजपचा अहंकार नष्ट झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय खळबळ उडाली होती. संघ भाजपच्या नेत्यांना सल्ले देत असल्याचा वाटायला लागले. मात्र, आता संघाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य हे आरएसएसचे वक्तव्य नाही. हे त्यांचे वैयक्तिक मत आहे.
इंद्रेश कुमार म्हणाले, या लोकांनी रामाची पूजा केली होती, पण हळूहळू त्यांच्यात अहंकार निर्माण झाला. आज प्रभू रामाने त्यांचा अहंकार नष्ट केला आहे. या निवडणुकीत हे लोक कौतुकास्पद निकाल देऊ शकले नाहीत. कदाचित आता त्यांना लोकशाहीची ताकद कळाली असेल. मात्र, रामजींच्या कृपेनेच भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष बनू शकला, पण असे असूनही रामजींची कृपा या लोकांना समजू शकली नाही. कदाचित त्यामुळेच या निवडणुकीत भाजपला जी सत्ता मिळायला हवी होती, ती रामजींनी भाजपला आलेल्या अहंकारापोटी थांबवली .
इंद्रेश कुमार यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, या निवडणुकीत प्रभू रामाच्या विरोधकांना चांगली कामगिरी करता आली, हे आश्चर्यकारक आहे. अर्थात, ते पहिल्या क्रमांकावर येऊ शकले नाहीत. पण अधिक चांगली कामगिरी करून दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान मजबूत करण्यात ते यशस्वी ठरले. म्हणून, आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, देवाचा न्याय विचित्र नाही, परंतु अत्यंत मोठे सत्य आहे. ही देवाची लीला आहे, जे मानवी मन समजू शकत नाही. राम भक्त असलेल्या पक्षाला केवळ 241 जागा मिळाल्या, पण सरकार बनवण्यात ते यशस्वी झाले. ज्यांची भक्ती नाही, ते चांगले काम करण्यात यशस्वी झाले. पण, सरकार बनवण्यात अपयशी ठरले. ही देवाची लीला आहे, जे मानवी मन कदाचित कधीच समजू शकणार नाही. ज्यांचा रामजींवर विश्वास नव्हता, त्यांना 234 जागांवरच थांबवण्यात आले.
विरोधी पक्षनेत्यांनी याकडे संघाने भाजपला दिलेला सल्ला म्हणून पाहिले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले, इंद्रेश कुमार अगदी बरोबर आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपची अशी दुर्दशा झाली असेल, तर त्याचे कारण भाजपचा अहंकार आहे. त्यांच्या अहंकारामुळेच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी म्हणाले की, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या वागण्यात अहंकार दिसून येतो. हे निवडणुकीनंतर बघितले. आता तुमचा अहंकार सोडा आणि आमच्या लोकांचे ऐका. काँग्रेसवर बोलू नका, कारण आम्ही रामाचे पूजक आहोत. तुम्ही व्यापारी आहात, असं देखील तिवारी म्हणाले.