पुणे : खासदार निलेश लंके यांनी पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याच्याकडून सत्कारही स्वीकारला आहे. त्यामुळे लंके वादाच्या भोव-यात अडकले आहेत.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे आणि आपल्या भेटीमागचे नेमकं कारण सांगितले आहे. खासदार निलेश लंके म्हणाले, मी दिल्लीवरुन आलो. माझे पवार नावाचे सहकारी होते. त्यांना कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांची भेट झाल्यानंतर आम्ही परत निघालो. त्यावेळी त्या भागातील आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी प्रविण धनवे यांच्या घरी गेलो. त्याच्या घरुन निघाल्यानंतर मारणे यांच्या घराजवळ आम्हाला चार सहा लोकांनी थांबवले. त्यांनी चहा पिण्यासाठी बोलवले.
आम्हाला तोपर्यंत कोणाची काहीच पार्श्वभूमी माहित नव्हती. त्यावेळी माझा सत्कार करण्यात आला. तोपर्यंत गजानन मारणे कोण हे मला माहितीही नव्हते. नंतर दोन तासांनी संबंधित व्यक्तीबद्दल माहिती कळाली. तो एक अपघात होता. कळत न कळत चूक झाली. गजा मारणेची भेट अपघाताने झाली असल्याचे निलेश लंके यांनी सांगितलं.
दरम्यान, निलेश लंके टीका करणा-यांना देखील उत्तर दिले. लंकेनी सांगितले की, टीका करणे हे त्यांचे कामच आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले पाहिजे. गजा मारणे कोण होता, हे मला माहित नव्हते. मला त्या व्यक्तीची ओळखच नाही. माझ्या मतदार संघात एक गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती नाही, त्यामुळे निवडणुकीत गजा मारणेची मदत झाल्याचा प्रश्नच येत नाही, असे खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.
दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुंड गजा मारणेचे नाव अनेक नेतेमंडळींशी जोडले गेल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याच्या नावाची चर्चा वारंवार पाहायला मिळत आहे.