पिंपरी : सोसायटीमधील फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन पिडीत महिलांची सुटका केली असून एका दलाल महिलेला अटक केली आहे.
तर घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरमालकाने भाडेकरार न करता फ्लॅट भाडेतत्त्वावर दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 11) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रहाटणी येथे केली आहे.
दलाल महिलेसह दशरथ जंगल कोकणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस अंमलदार संगिता जाधव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दलाल महिलेने कोकणे याच्याशी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांना पैशांचे अमिष दाखवले. त्यातून त्या महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेकडील अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने दशरथ कोकणे याच्या रहाटणी येथील शिवीजी चौकातील फ्लॅटमध्ये अचानक छापा टाकला.
त्यावेळी आरोपी दलाल महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलाकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दोन तरुणीची सुटका करुन महिलेला अटक केली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.