पुणे : जिल्ह्याच्या सीमेवरील आणि सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे तब्बल ३.८४ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ७.२१ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. सध्या या धरणात उणे ५२.७८ टक्के पाणीसाठा आहे.
पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याला उजनी धरणातून पाणी दिले जाते. गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे हे धरण केवळ ६० टक्के भरले होते. त्यामुळे यंदा या धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावला होता. पुणे शहराला दरमहा एक ते सव्वा टीएमसी पाण्याची गरज भासते. त्यानुसार विचार केल्यास पुणे शहराला तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा उजनी धरणात पावसामुळे जमा झाला आहे. मात्र, हे धरण मोठे असल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
६ जून रोजी या धरणात उणे ३२.१४ टीएमसी (उणे ५९.९९ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. सध्या म्हणजेच १३ जूनपर्यंत या धरणात उणे २८.२७ टीएमसी (उणे ५२.७८ टक्के) पाणीसाठा आहे. १ जूनपासून उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये ९ आणि १२ जून रोजी अनुक्रमे ४८ मि.मी. आणि ६० मि.मी. असा सर्वाधिक पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला जातो आणि हे पाणी उजनी धरणात सोडले जाते.