लोणी काळभोर : श्री महंत १००८ सदगुरु देविपुरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय येथे, शनिवार (दि. १५) पासून अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती रामदरा शिवालयाचे श्री महंत १००८ हेमंतपुरी महाराज यांनी दिली.
श्री रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले लोणी काळभोर (ता. हवेली), येथे रामदरा हे तीर्थक्षेत्र आहे. धुंदीबाबांनी अक्षरशः डोंगर व खडक फोडून तीर्थक्षेत्र रामदरा तयार केला आहे. धुंदीबाबा हे मूळचे सातारा जिल्ह्यातील बेलावडे गावचे होते. बाबाजी येथे आले तेव्हा हा परिसर म्हणजे ओसाड माळरान होते. बाबांनी आपल्या कष्टाने येथे नंदनवन फुलविले आहे. जवळच एक तळे होते. त्याला रामकुंड म्हणत. त्याकाळीही लोक दर्शनासाठी येत असत. अशा ओसाड आणि निर्जन ठिकाणी बाबांचे आगमन झाले आणि परिसराचा चेहरामोहरा बदलून गेला.
धुंदीबाबांनी पूजाअर्चा व धार्मिक कार्यक्रम चालू केले. भक्तांची गर्दी वाढली. त्या भक्तांच्या ऐच्छिक लोकवर्गणी मधून महादेव मंदिराचे काम पूर्ण करण्यात आले. सन १९८२ व १९९६ साली विश्वशांती व लोककल्याणासाठी सपादकोटी गायत्री महायज्ञ करण्यात आले. या दोन्हीही महायज्ञांच्या वेळी चारही पीठांचे शंकराचार्य आवर्जून उपस्थित होते. सोमवार दि. २४ जून २००२ ला धुंदीबाबांनी आपली इहलोकातील यात्रा संपविली. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात येते.
शनिवार (दि.१५) ते शुक्रवार (दि.२१) यादरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या महाराजांची प्रवचने व कीर्तने होणार आहेत. शनिवारी (दि.१५) रोजी बाळासाहेब महानवर महाराज व समाधान महाराज नावडे, रविवार (दि.१६) उत्तम महाराज खोले व हर्षवर्धन महाराज घोडेकर, सोमवार (दि.१७) किसन वारे महाराज व अक्षय महाराज बारबैले, मंगळवार (दि. १८) श्रीकृष्ण बोरकर महाराज व ज्ञानेश्वर महाराज नरके, बुधवार (दि.१९) नितीन महाराज जंजिरे व सागर महाराज पुंगळे, गुरुवारी (दि.२०) दत्तात्रय काळभोर महाराज व ओमकार महाराज मुळजे यांचे होणार आहे. तर शुक्रवारी (दि.२१) रोजी धुंदीबाबा समाधी सोहळा व वटपौर्णिमे साजरी करण्यात येणार आहे. या वेळी सकाळी ९ ते ११ दरम्यान हभप विनोद महाराज काळभोर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. अखंड हरीनाम सप्ताहात पहाटे ४ ते ६ श्रींची पुजा, ८ ते १२ पारायण, १२ ते १ श्री ची आरती, ३ ते ५ पारायण, ५ ते ६ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ व ७ ते ९ किर्तन होणार आहे.