लोणी काळभोर : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून, धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने येरवडा कारागृहात 10 दिवसासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली आहे. राज रवींद्र पवार (वय 25, रा.कवडी पाट टोलनाका, कदमवाकवस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज पवार हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर शरीर व मालमत्तेविरुद्धचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले होते. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता.
गुन्हेगार राज पवारवर कायद्याच्या वचक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलिसांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. सदर प्रस्ताव हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केला असता, न्यायालयाने राज पवारला येरवडा मध्यवर्ती कारागृहात 10 दिवसासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी राज पवारला येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
सदर कारवाई पोलीस उपयुक्त आर. राजा, सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस हवालदार तेज भोसले, पोलीस नाईक संदीप धनवटे, पोलीस अंमलदार मंगेश नानापुरे व पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे यांनी केली आहे.
यापुढेही शरीर व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन, त्यांच्या हालचालीवर नजर ठेवून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
शशिकांत चव्हाण (वरिष्ठ पोलीस निरीक्षक – लोणी काळभोर पोलीस ठाणे)