नवी दिल्ली : प्रसिद्ध स्नॅक्स कंपनी हल्दीरामची विक्री होणार असल्याचे सांगण्यात आले होते. याबाबतचे वृत्तही अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर आता एक महत्त्वाची बातमी आली आहे. ‘हल्दीराम’च्या विक्रीला आता ब्रेक लागणार असून, कंपनीची विक्री होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार, कंपनीकडून आता स्वत:चा आयपीओ बाजारात आणण्याच्या हालचाली सुरु आहेत.
हल्दीरामने विदेशी गुंतवणूकदारांसोबत विक्रीबाबतची चर्चा पूर्णपणे थांबवली आहे. कंपनीला 12 अब्ज डॉलरचे व्हॅल्यूएशन मिळेल. मात्र, हल्दीरामची खरेदी करण्यासाठी कोणत्याही कंपनीने 8 ते 8.5 अब्ज डॉलर पेक्षा अधिकची किंमत मोजण्याची तयारी दर्शवली नसल्याची माहिती आहे. ब्लॅकस्टोनसह अनेक कंपन्यांनी हल्दीरामचे जवळपास 74-76 टक्के भाग खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, आता या कंपन्यांच्या ऑफर्स हल्दीराम मॅनेजमेंटला पसंत न आल्याने कंपनीने आपला निर्णयच बदलला आहे.
दरम्यान, कंपनीने आता आपला विक्री करण्याचा निर्णय मागे घेतला असून, स्वतःला आणखी मजबूत करण्याचे ठरवले आहे. यासाठी कंपनीकडून बाजारात आयपीओ आणण्याचा देखील विचार केला जात आहे.