दौंड (पुणे) : दौंड येथील महात्मा गांधी चौकातील वर्दळीच्या ठिकाणी महावितरणाच्या रोहित्राला आग लागल्याची घटना घडली आहे. आज गुरुवारी (दि.13) सकाळी रोहित्राचा स्फोट झाल्यानंतर आग लागून ती पसरली गेली. ही आग भडकल्याने परिसरात घबराट उडाली आहे.
यावेळी महावितरणाच्या रोहित्राच्या खाली पुजेचे साहित्य, बांगडी विक्रेते हे रोज बसत असतात. यावेळी रोहित्राला लागलेल्या आगीमुळे पुजेचे साहित्य भस्मसात झाले आहे. त्यामुळे आगीचे आणि धुराचे लोट छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दिसत होते.
नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शाहू पाटील यांनी कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसी व दौंड शुगर प्रा. लि. यांच्या अग्निशामक विभागाशी संपर्क साधून बंब बोलवण्यात आले. ऑईल असल्याने बंबातील फोमचा मारा करुन आगीवर नियंत्रण आणण्यात आले आहे.
दरम्यान, दौंड नगरपालिकेचा अग्निशामक बंब दुरुस्तीसाठी पाठविल्याने आग विझवण्यास दोन तासांचा विलंब झाला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झाली नाही. रोहित्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.