तळोजा: तळोजा पोलिसांनी रविवारी पहाटे तळोजा सेक्टर १० मधील एका घरात छापा मारुन सुमारे तीन लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी कारमध्ये ठेवलेला गुटख्याचा साठा व कार जप्त करून दोघांना अटक केली. तसेच त्यांनी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ कुठून आणला, याबाबत तपास सुरू केला आहे.
तळोजा फेज १ मधील एका इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये तसेच कारच्या मालकाकडे सुगंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती परि.२ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना मिळाली. त्यानुसार स. पो. नि. विजय पवार यांनी रविवारी तळोजा सेक्टर १० मधील मिडलैंड सोसायटीत धाव घेतली. यावेळी कारची तपासणी केली असता, त्यात गुटख्याच्या गोण्या ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी कार मालकाच्या घरावर छापा मारला असता, त्यामध्ये मो. हमजा शाहीद खान व अल्ताफ कासिम खान हे दोघे राहत असल्याचे व त्यांनी घरामध्ये नायलॉनच्या गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा ठेवल्याचे आढळून आले.