नाशिक : चोरी व गहाळ झालेल्या मोबाईलविषयी होणाऱ्या तक्रारींची दखल घेत मुंबईनाका पोलिसांनी सीईआयआर प्रणालीच्या माध्यमातून तब्बल साडे दहा लाख रूपये किमतीचे ५० महागडे मोबाइल शोधून काढत ते मुळ मालकांच्या स्वाधिन करण्यात आले आहेत.
मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे अंमलदार समीर शेख यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कामगिरी केली. सीईआयआर या प्रणालीच्या माध्यमातून आयफोन, सॅमसंग, वनप्लस, रेडी, विवो, ओपो, आयटेल व मोटो आदी विविध कंपन्यांचे ५० महागडे मोबाइल हस्तगत करण्यात आले. याकामी शेख यांना सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक निसार शेख, जमादार रोहिदास सोनार, अंमलदार गणेश बोरणारे व नवनाथ उगले आदींच्या पथकाने मदत केली. पथकाने हस्तगत केलेले मोबाईल मंगळवारी (दि.११) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते मूळ मालकांना वितरीत करण्यात आले. दरम्यान, हरवलेले व चोरीस गेलेले महागडे मोबाईल परत मिळाल्याने मोबाईलधारकांनीही पोलिसांचे आभार मानले आहेत.