मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार झाला होता. या गोळीबार प्रकरणात सलमानचा जबाब नोंदवण्यात आला आहे. 4 जूनला मुंबई पोलिसांनी हा जबाब नोंदवला. बिश्नोई गँगने सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता.
मुंबईतील वांद्रेमध्ये अभिनेता सलमान खानच्या घरावर आरोपींनी 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला होता. गोळीबाराच्या या घटनेने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य ओळखत तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी 72 तासांमध्ये आरोपींच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्या. सागर पाल आणि विकी गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी बिहारमध्ये सराव केला असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.
या प्रकरणामध्ये सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी बंदुक देणाऱ्या आरोपींनाही पोलिसांनी पकडलं होतं. अनुज कुमार थापन आणि सोनू चंदर अशी त्यांची नावे आहेत. मात्र यामधील आरोपी अनुज थापन याने 1 मेला तुरूंगामध्येच आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं.
अभिनेता सलमान खान याने 4 जूनला पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. आता सलमान खानने नोंदवलेल्या जबाबामधून काही महत्त्वाचा पुरावा किंवा काही नवीन माहिती मिळते का? की जी या गोळीबार प्रकरण तपासासाठी महत्त्वाची ठरेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.