पुणे : नवीन बांधलेल्या घराचा कर कमी करण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या पुणे महापालिकेच्या औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील दोन लिपिकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. सुमीत राजेंद्र चांदेरे (वय-२८) आणि प्रशांत शिवाजीराव घाडगे (वय-३४) अशी अटक करण्यात आलेल्या लिपिकांची नावे आहेत.
रात्री उशिरा दोघांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराने नवीन घर बांधले आहे. कर आकारणीसाठी तक्रारदाराने क्षेत्रीय कार्यालयात अर्ज केला होता. कर आकारणी कमी करून देतो, असे क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक घाडगे याने ज्येष्ठ नागरिकाला सांगितले होते. त्यासाठी घाडगे आणि चांदेरे यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली.
याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा रचून तक्रारदाराकडून २५ हजारांची लाच घेणाऱ्या चांदेरे आणि घाडगे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव, पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी ही कारवाई केली.