जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या 5 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे अनेक आमदार खासदार त्यांच्या भेटी घेत आहे. मनोज जरांगे पाटील हे सगेसोयऱ्याचं आरक्षण मिळावं, या मागणीसाठी गेले ५ दिवस झाले पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, आता धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
ओमराजे निंबाळकर म्हणाले, मनोज जरांगेंनी त्यांच्या पद्धतीने त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. उपोषण असलं तरी त्यांनी पाणी पिलं पाहिजे, मी त्यांना विनंती केली आहे. सरकारने जे आश्वासन दिलेलं आश्वासन म्हणजे एका पद्धतीने फसवणूक केल्याचा प्रकार अशी समाजाची मानसिकता तयार झालेली आहे. सरकारने या उपोषणाची दखल घेऊन तातडीने पावलं उचलली पाहिजेत. आपण प्रत्येक गोष्ट राजकारणाकडे नेणे योग्य वाटत नाही. हे समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत आणि या माणसाचा अखंडपणे समाजासाठी लढा सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे आपण राजकारण म्हणून बघितलं नाही पाहिजे, असं आवाहनही ओमराजे निंबाळकर यांनी केलं.
तामिळनाडूमध्ये आरक्षण टिकतं आपल्याकडे का नाही?
पुढे बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, तामिळनाडू सरकारने 50% ची आरक्षण मर्यादा ओलांडली असताना ते आरक्षण टिकत, आपलं आरक्षण टिकू शकत नाही? केंद्र सरकारला याबाबत आम्ही वारंवार विनंती करत आहोत. तरी सरकारला कळत नाही आहे. यामुळे समाजाचा रोष निर्माण होतो. याबाबत सरकारने मार्ग काढावा, यासाठी पूर्ण ताकतीने आम्ही मागे लागू. तामिळनाडू भारताचे राज्य व तिथे आरक्षण टिकतं आपल्याकडे का टिकू शकत नाही? असा सवालही यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी केलाय.
खासदार संजय जाधव यांचाही मनोज जरांगेंना पाठिंबा
ओमराजे निंबाळकर यांच्याशिवाय ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांनीही आधी मनोज जरांगेंची भेट घेतली होती. त्यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.