पिंपरी : चाकण परिसरात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. घराच्या छतावर विजेचा करंट लागून आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पल्लवी जाजू असे आई तर समर्थ जाजू असे 15 वर्षीय मुलाचं नाव आहे. ही घटना मंगळवारी ११ जून रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खराबवाडी येथे घडली आहे. मुलाला करंट लागल्याचे लक्षात येताच आई त्याला वाचवण्यासाठी धावली आणि ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरातील खराबवाडी येथे जाजू कुटुंब वास्तव्यास आहे. मंगळवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आई टेरेसवर स्वच्छता करण्यासाठी गेली होती. तिच्याबरोबर मुलगाही टेरेसवर गेला होता. जिन्यातून पाणी आत येऊ नये म्हणून करण्यात आलेल्या छताच्या पत्रात विद्युत प्रवाह उतरला होता. त्या ठिकाणी लोखंडी अँगलमधून तार खाली लोंबकळत होती.
त्यातही विद्युत प्रवाह उतरला होता. त्या तारेला सर्मथचा हात लागला, त्याला करंट लागल्याचे पाहून आईने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दोघांचाही करंट लागून जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चाकण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.